ईडीचे दुसऱ्या दिवशीही मुंबईत छापे : ठाकरे अडचणीत येणार?
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही ईडीने मुंबईत छापे टाकले. ईडीच्या पथकाने आज सकाळी मुंबई महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईमुळे उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल बुधवारी ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांसह तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापे टाकले. यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, संजय शहा, नितीन गुरव यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित 15 ठिकाणांची झडती घेण्यात आली. सूरज चव्हाण यांच्या घरातून ईडीचे पथक रात्री दीड वाजता बाहेर पडले.
सकाळी आठच्या सुमारास ईडीचे पथक सूरज चव्हाण यांच्या घरी धडकले होते. त्यामुळे कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या तपासाने आता वेग घेतल्याचे दिसत असून ईडी आणखी काही पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईडीचे अधिकारी सध्या महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार या दोन्ही अधिकाऱ्यांची विचारपूस करत असल्याची माहिती आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात असून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. तसेच, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोना काळात ठाकरे सरकारने दिलेल्या कंत्राटांची ईडी सध्या कसून चौकशी करत आहे. त्यामुळे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व तत्कालीन पालिका अधिकारी ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यानुसारच आज आणखी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.