कोल्हापुरात कडकडीत बंद : दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिवराज्याभिषेक दिनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली.
तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.