Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोबाईल बाजूला ठेवा, हातात काठी घ्या! पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे आदेश : क्राईम मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना धरले धारेवर

मोबाईल बाजूला ठेवा, हातात काठी घ्या!
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे आदेश : क्राईम मिटिंगमध्ये अधिकाऱ्यांना धरले धारेवर



सांगली : खरा पंचनामा

पोलिसांनी मोबाईलचा वापर कमी करुन तो बाजूला ठेवावा आणि हातात काठी घ्यावी, असे सक्त आदेश  पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले. गुरुवारी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये त्यांनी सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शहरातील बीट मार्शल यांचे मोबाईल क्रमांक नागरीकांसाठी जाहीर करण्यात येणार असून तीन महिने तेच बीट मार्शल राहणार आहेत. पोलिस अधीक्षकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आज तातडीने पोलिस कामाला लागले आहे. आज रात्रीपासूनच पोलिस दलातील या नव्या रचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

मागील काही महिन्यांपासून सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. माजी गृहमंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवसापुर्वी अधीक्षकांची भेट घेत सूचना मांडल्या होत्या. त्यानंतर आज गुन्हेगारीचा आढावा घेणारी क्राईम मिटिंग घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

प्रत्येकाच्या गुन्ह्यांची बारकाईने माहिती अधीक्षकांनी घेत तपासाच्या सूचना दिल्या. बेसिक पोलिसिंग राबविण्याकरिता कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. पोलिस अधिक्षकांनी सांगलीतील पोलिसांच्या हातात काठी असलीच पाहिजे अशी भूमिका घेतली. मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या पोलिसांबाबतही कारवाईच्या सुचना दिल्या. सांगली मिरज आणि कुपवाड या कार्यक्षेत्रातील सहा पोलिस ठाण्यात प्रत्येकी चार बीट मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे. म्हणजेच शहरात २४ बीट मार्शल गस्त घालणार आहेत. यामध्ये असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तीन महिने हेच काम देण्यात येणार आहे. पोलिस ठाणेनिहाय त्यांच्याकडे एक मोबाईल क्रमांक देण्यात येणार असून तो नागरिकांपर्यत पोहचविण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी एकेरी वाहतूक करावी तसेच प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी असेही निर्देश डॉ. तेली यांनी दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.