राधानगरीहुन निघालेली एसटी बस आनेवाडीजवळ जळून खाक!
सातारा : खरा पंचनामा
पुणे-बंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर राधानगरीहुन पुण्याकडे जाणाऱ्या विठाई एसटी बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर फक्त वीस मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली.
चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून तातडीने खाली उतरल्याने जिवीत हानी झाली नाही. मात्र बस पूर्ण जळून खाक झाली.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथून बस (एमएच १३ ८४१३) स्वारगेटकडे निघाली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावरून सताऱ्याकडून पुण्याकडे जात असताना आनेवाडी येथील टोल नाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे चालक सागर चौगुले यांना दिसले.
क्षणात त्यांनी बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. दहा ते पंधरा मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली. महामार्गवर यावेळी धुराचे लोट पहावयास मिळाले. भुईज पोलीसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. वाई नगरपालिका आणि किसन वीर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग विझवली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.