दरोड्याप्रकरणी रिलायन्समधील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
शहरातील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर दरोडा टाकणारे संशयित परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरोड्याचा सर्व बाजूने कसून तपास करण्यात येत आहे. संशयितांच्या शोधासाठी केवळ सांगलीच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील पथकेही पाठवण्यात आली आहेत. दरम्यान या दरोड्यामध्ये रिलायन्समधील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचा कसून तपास सुरू असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान रिलायन्स ज्वेल्सवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला. या दरोड्यात सोन्या चांदीचे दागिने तसेच मूल्यवान हिरे, रोकड, मोबाईल असा तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आठ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयितांनी वापरलेली दुचाकी, टाटा सफारी गाडी पोलिसांनी जप्त केल्याचेही श्री. फुलारी यांनी सांगितले.
या दरोड्याचा युद्धपातळीवर तपास करण्याचे आदेश सांगली पोलिसांना दिले आहेत. सांगली पोलिसांशिवाय कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीणच्या पोलिसांची पथकेही यातील विविध राज्यांमध्ये संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान रिलायन्समधील कमर्चाऱ्यांकडे केलेल्या चौकशीनंतर सर्व संशयित परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांनी या दुकानाची काही दिवस आधी रेकी केल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. यातील संशयितांना लवकरच पकडण्यात येईल असेही श्री. फुलारी यांनी सांगितले.
या दुकानात सुरक्षा रक्षक नव्हता तसेच तेथे २१ कर्मचारी असतानाही कोणीही पोलिसांना तात्काळ कळवले नाही. दरोडा पडल्यानंतरही पोलिसांना याची माहिती देण्यास विलंब करण्यात आला. तसेच या दुकानातील अलार्मही सुरू करण्याचे कोणी धाडस केले नाही. त्यामुळेच या दुकानातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचेही श्री. फुलारी यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.