पोलिस हवालदारासह तीन कर्मचारी निलंबित!
तरुणीवर कोयत्याने हल्ला प्रकरण
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ला प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.
तसेच, या तरुणीसमवेत असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) याला अटक केली. परंतु पेरूगेट पोलास चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली.
संशयित शंतनू जाधवला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सध्या त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.