लग्नाच्या वरातीतील गोळीबार आला अंगलट : तरूण जखमी, सेवानिवृत्त पोलिसासह दोघांना अटक
शिराळा : खरा पंचनामा
शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथे लग्नाच्या वरातीत रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार केल्याची घटना संबंधितांना चांगलीच अंगलट आली आहे. वरातीवेळी केलेल्या गोळीबार प्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह दोघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
यामध्ये ऋतिक दिलीप इंगळे (वय २३ , रा.भाटशिरगाव) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी गोळीबार करणारा ओमकार भगवान देसाई (वय २५), रिव्हॉल्वर परवानाधारक सेवानिवृत्त केंद्रीय राखीव पोलिस दलाचे संजय सखाराम देसाई (वय ५२ , दोघे रा.भाटशिरगाव) यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत जखमी ऋतिक इंगळे याने शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भाटशिरगाव येथे लग्नात रात्री साडेआठच्या सुमारास ऐन जल्लोषात आलेल्या वरातीत तरूण संगिताच्या तालावर नाचत होते. त्या ठिकाणी ऋतिक त्याचा भाऊ अजय इंगळे, नातेवाईक सनी गायकवाड सहभागी होते. त्यावेळी सेवानिवृत्त केंद्रीय राखीव पोलिस दलाचे संजय देसाई यांचे रिव्हॉल्व्हर ओमकार देसाईने घेवून एक गोळी हवेत उडवली. मात्र दुसरी गोळी उडवत असताना ती हवेत न उडता अचानक समोर असणाऱ्या ऋतिक इंगळेच्या डाव्या दंडावर घुसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
जखमी ऋतिकला उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, काल रात्री उशिरा दोघा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना आज शिराळा येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यातील एक रिव्हॉल्व्हर, जखमी ऋतिकच्या अंगावरील जर्किन, दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.