येळावीत नवदांपत्याची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या!
तासगाव : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील येळावी येथील नवदांपत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. काल पहाटे ही घटना घडली. दोघांचा विवाह गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
राज संजय जाधव (वय २९) आणि ऋतुजा राज जाधव (२०) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. येळावी येथील राज संजय जाधव आणि सावर्डे (ता. पन्हाळा) येथील ऋतुजा महादेव पाटील यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांचे धनगाव रस्त्यावर घर आहे. काल पहाटेच्या सुमारास राज यांचे वडील संजय हे जागे झाले झाल्यानंतर त्यांना राज उलट्या करताना दिसला तर ऋतुजा बेडवर बेशुद्ध पडल्याचे दिसले. बाजूला द्राक्ष बागेवर फवारायचे विषारी औषधाची बाटली पडलेली दिसली.
त्यांनी लगेच बाजूला रहाणारे भाऊ तानाजी जाधव यांना बोलवून घेऊन त्या दोघांना तासगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथून तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी ऋतुजा यांचे वडील महादेव राजाराम पाटील (रा. सावर्डे, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तासगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यांच्यावर आज सकाळी अकरा वाजता येळावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राज जाधव हे घरगुती बिस्किटे बनविण्याचा व्यवसाय व द्राक्षबाग शेती करत होते. काल दिवसभर शेतीची कामे केली होती. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे पगार देवून घरी आले होते. तासगाव पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.