कुपवाडमध्ये तरूणाचा खून : दोघांना अटक
घोडागाडी शर्यतीवेळी झालेल्या वादातून कृत्य, अल्पवयीनही ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
कुपवाड येथे दाबेलीचा गाडा चालवणाऱ्या तरूणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून शुक्रवारी रात्री खून करण्यात आला होता. याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने सांगलीतील दोन तरूणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. घोडागाडी शर्यतीवेळी झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
यश प्रशांत सौंदडे (वय १९, रा. अंबा चौक, यशवंतनगर, सांगली), प्रतीक ऊर्फ पप्पू संभाजी वगरे (वय १९, रा. संजयनगर सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतीश बयाजी माने (वय ३५) यांनी फियार्द दिली आहे. शुभम माने असे मृत तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शुभम याचा त्याच्या हातगाडीवर जाऊन संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तातडीने यातील संशयितांना पकडण्याचे आदेश एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांना दिले होते.
त्यानुसार शिंदे यांनी संशयितांच्या शोधासाठी पथक पाठवले होते. शनिवारी या खुनातील संशयित यश सौंदडे आणि प्रतीक वगरे माधवनगर येथील बस स्टॉपजवळ पळून जाण्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर घोडागाडी शर्यतीवेळी पूर्वी झालेल्या वादातून त्याचा खून केल्याची कबुली दिली. या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.