विरोधकांच्या मतदारसंघातच दंगली का? जयंत पाटील यांचा सवाल
सांगली : खरा पंचनामा
राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती गंभीर आहे. सध्या सुरू असलेल्या दंगली पाहता त्यामध्ये एक पॅटर्न दिसून येतो. त्यातूनच फक्त विरोधक ज्या मतदारसंघात प्रबळ आहेत त्याच मतदारसंघात दंगली का होतात असा सवाल माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
पाटील मंगळवारी सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात होणाऱ्या या दंगली होतात की घडवल्या जातात अशी शंका निर्माण होत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करतय का याचा सरकारने शोध घ्यायला हवा. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला पूर्ण सहकार्य करेल असेही ते म्हणाले.
विरोधकांची ताकद ज्या मतदारसंघात जास्त आहे तेथेच दंगली होत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा खासदार नाही. तेथे दंगल झाली. मालाडमध्ये काँग्रेसचा आमदार आहे, तेथेही दंगा झाला. अकोल्यात ते कमजोर आहेत तेथेही असा प्रकार घडला. अहमदनगर, नाशिक येथे राष्ट्रवादी बळकट आहे तेथेही दंगली झाल्या, असे पाटील म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा एकही आमदार, खासदार नाही तेथे तणाव निर्माण झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्यात अशी घटना घडणे चिंता वाढवणारी आहे. तेथे अचानक दंगा झाला, अचानक लोक एकत्र आले असे का होत आहे याचा सरकारने विचार करावा असेही ते म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यांना त्यासाठी हवे ते सहकार्य आम्ही करू असेही पाटील यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.