विट्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, एकाला अटक
सांगली : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील विटा येथे तासगाव-आळसंद रस्त्यावर एकाला अटक करून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. एका दुचाकीसह १७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याला दि. १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
भगतसिंग विक्रमसिंग शिख (वय २१, रा. जुना कुपवाड रोड, नेहरूनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणारे तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विट्याचे निरीक्षक श्री. डोके यांनी एक विशेष पथक तयार केले होते.
शनिवारी हे पथक विट्यात गस्त घालत असताना तासगाव-आळसंद बायपास रस्त्यावर एक तरूण मोठ्या प्रमाणात तलवारी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे सापळा रचला होता. खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार तरूण दुचाकीवरून येताना पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये १७ लोखंडी तलवारी आढळून आल्या. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्या विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याची दुचाकी (क्र. एमएच १४ ईई २९५५) जप्त करण्यात आली.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, राजेंद्र भिंगारदेवे, अमरसिंह सूर्यवंशी, शशिकांत माळी, महेश देशमुख, हणमंत लोहार, सुरेश भोसले, रोहित पाटील, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.