Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नालसाब मुल्ला खूनप्रकरणी तिघांना अटक; अल्पवयीन ताब्यात डोंगरेच्या जामिनाला विरोध केल्याने कृत्य कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तर जयसिंगपूरच्या एकाचा समावेश

नालसाब मुल्ला खूनप्रकरणी तिघांना अटक; अल्पवयीन ताब्यात 
डोंगरेच्या जामिनाला विरोध केल्याने कृत्य कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन तर जयसिंगपूरच्या एकाचा समावेश 



सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास मुल्ला याच्यावर अंधाधुंद गोळीबार करत त्याचा खून करण्यात आला होता. रविवारी दुपारी एलसीबीच्या पथकाने अंकली-हरिपूर रस्ता परिसरातून चौघांना ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान सचिन डोंगरे याच्या जामिनासाठी सतत विरोध केल्यानेच त्याचा खून केल्याची कबुली दिल्याची संशयितांनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


सनी सुनील कुरणे (वय २३, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (वय २०, रा. लिंबेवाडी, रांजणी), स्वप्नील संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मुल्ला त्याच्या घरासमोर एकाशी बोलत बसला होता. त्यावेळी त्याच्या घराशेजारच्या रस्त्यावरील अंधारातून चार संशयित तेथे आले. त्यांनी काही कळायच्या आतच अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात मुल्ला याला सहा गोळ्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयित तेथून चालत निघून गेले. तेथेच अंधारात उभ्या केलेल्या बुलेटस अन्य दुचाकीवरून चौघेही संशयित निघून गेले. 

दरम्यान २०१९ मध्ये सचिन डोंगरे याच्यावर मोका अंतगर्त कारवाई करण्यात आली होती. त्याचा जामीन लवकर होऊ नये तसेच तो कारागृहातून बाहेर येऊ नये यासाठी नालसाब मुल्ला सातत्याने प्रयत्नशील होता. डोंगरे याच्या जामिनाला सतत नालसाब मुल्ला याने सतत विरोध केला होता. त्याचा राग आल्यानेच सचिन डोंगरे याने संशयित चौघांना नालसाब मुल्ला याची गेम करण्यासाठी डोंगरे यानेच सांगितल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. 

गुन्हेगारी क्षेत्रात नाव करण्यासाठी घेतली सुपारी
यातील एक संशयित स्वप्नील मलमे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या संशयितांनी गुन्हेगारी क्षेत्रात नाव करण्यासाठीच डोंगरे याच्याकडून सुपारी घेऊन नालसाब मुल्ला याचा खून केल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, अमितकुमार पाटील, दीपक गायकवाड, संदीप नलवडे, अरूण औताडे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.