सांगलीतील नामचीन गुन्हेगार, बार चालक पोलिसांच्या रडारवर!
जयसिंगपूरचेही काहीजण येणार अडचणीत
नालसाब मुल्ला खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा शनिवारी निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी सांगली पोलिसांच्या रडारवर सांगलीतील नामचीन गुन्हेगार आहेतच शिवाय काही बार चालक आणि अन्य काहीजणांचा समावेश आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे काहीजण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नालसाब मुल्ला खूनप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. सनी सुनील कुरणे (वय २३, जयसिंगपूर, ता. शिरोळ), विशाल सुरेश कोळपे (२०, लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ) व स्वप्निल संतोष मलमे (२०, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेत. मोक्यातील गुन्हेगार सचिन डोंगरे यानेच सुपारी दिल्याने खून केल्याची संशयितांनी कबुली दिली आहे. मात्र पोलिसांना त्यांच्या या कबुलीवर विश्वास नाही असे दिसते.
संशयित जरी डोंगरे याच्या सांगण्यावरून खून केल्याचे सांगत असले तरी पोलिस प्रत्येक कोनातून या खुनाचा तपास करत आहेत. त्यामुळे त्यांनी मुल्ला याच्या विरोधात असलेल्या लोकांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगार यात पडद्यामागे सामील आहेत का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
यामध्ये सांगलीतील नामचीन गुन्हेगारांचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याचे समजते. शिवाय गुन्हेगारांशी संबंधित असलेले बार, हॉटेल चालक यांच्यावरही पोलिसांचा वॉच असल्याचे समजते. त्यामुळे डोंगरेशिवाय अन्य कोणी मुल्ला याच्या गेमची सुपारी दिली आहे का याचाही तपास सुरू असल्याचे समजते.
दरम्यान यातील एक संशयित जयसिंगपूरचा आहे. त्याच्याशी संबंधित तसेच त्याच्या संपर्कात असलेले काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. या लोकांची कधीही चौकशी होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जयसिंगपूरचे काहीजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.