Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली : जयंत पाटील यांचा आरोप

जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली : जयंत पाटील यांचा आरोप
 

सांगली : खरा पंचनामा

शहरातील मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या गोळीबार करत रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला. पोलिस असल्याची बतावणी करून महिलेचे अपहण केले गेले. दरोडा, खुन, चेनस्नॅचिंग, मारामारीसह गुन्हेगारीने कळसच गाठला आहे. दुसऱ्या बाजूला अवैध धंदे फोफावले आहेत. नशेबाजांची वाढती गुन्हेगारीही डोकेदुखी बनली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे बिघडली आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला.

मंगळवारी त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक सूचना केल्या. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिक भयभीत झाले आहेत. नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करा. याबाबतचे निवेदनही पाटील यांनी डॉ. तेली यांना दिले. 

यावेळी श्री. पाटील म्हणाले,‘‘मागील सात आठ महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात दरोडे, चोऱ्या, खून यांच्या आकडेवारीत मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने व्यापारी भयभीत झालेले आहेत. खुनाची तर मालिकाच सुरू आहे. मंगळसुत्र चोरणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दररोज एकतरी दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप चोरीला जात आहे. घराचे दार सुद्धा उघडे ठेवण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. तरी सुद्धा पोलिसांचा धाक राहिला नाही.’’ 

ते म्हणाले,‘‘जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. शहरात मटका, गांजा, नशेच्या गोळ्या देखील सहजरीत्या उपलब्ध होत आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे तरुण व अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. नशेमुळेच खून, मारामाऱ्या, चोऱ्या या सारख्या घटना घडल्याचे प्रकार समोर येत आहेत. शहरातील वाहतूक अत्यंत धोक्याची झाली आहे. याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडवीण्याचे काम काही दृष्ट प्रवृत्ती करत आहेत. सांगली जिल्हा शांत व संयमी नागरिकांचा जिल्हा म्हणून ओळख होती मात्र सध्या कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे. पोलिसांनी आपली कार्यतत्परता दाखवून सामान्य नागरिकांना भयमुक्त करावे.’’ त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी साऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, असे सांगितले. 

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव शेखर माने, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.