सांगलीत बांधकाम साहित्य पुरवठादाराचा गोळ्या झाडून खून
घराच्या दारातच घातल्या गोळ्या अंधारातून आलेल्या चौघांचे कृत्य, कारण अस्पष्ट
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर आज रात्री गोळीबाराच्या थराराने हादरले. शहरातील हनुमाननगरजवळ असलेल्या गुलाब कॅलनीत एका बांधकाम साहित्य पुरवठादारावर बारा गोळ्या झाडत त्याचा खून करण्यात आला. या व्यावसायिकाच्या दारातच शनिवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंधारातून आलेल्या चौघांनी अंधाधुंद गोळीबार करत हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
नालसाब मुल्ला (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. मुल्ला यांचा वाळू, विट, खडी, दगड असे बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे. ते सांगलीतील हनुमाननगरजवळ असलेल्या गुलाब कॉलनीत कुटुंबासमवेत रहात होते. शनिवारी रात्री ते त्यांच्या घराबाहेर थांबले होते. त्यावेळी त्यांच्या घराला लागून असलेल्या रस्त्यावरील अंधारातून मुल्ला यांच्या घरासमोर चौघेजण आले. मुल्ला यांना काही कळण्यापूर्वीच त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर मुल्ला रक्ताच्या थारोळ्यात दारातच पडले. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासात रात्री उशीरापर्यंत १२ पुंगळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे या चौघांनी त्यांच्यावर बारा गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय सूत्रांनुसार त्यांना सहा गोळ्या लागल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान मुल्ला यांच्या घराशेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या रस्त्यावर अंधार आहे. त्या अंधारातूनच हल्लेखोर आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. शिवाय गोळीबार केल्यानंतर ते त्याचा दिशेने निघून गेले. त्यानंतर बुलेटसह अन्य वाहनांवरून ते पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे. मुल्ला यांचा बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यातील वाळू विक्रीवरून त्यांचा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सावकारीच्या कारणाचाही शोध
दरम्यान मुल्ला सावकारी तसेच जागेचे मोठे व्यवहार करत होते अशी चचार् घटनास्थळी होती. त्यातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा अशीही चचार् आहे. त्यामुळे सावकारी किंवा जागेतील व्यवहारातून त्यांच्यावर हल्ला झाला का याचाही पोलिस तपास करत आहेत.
राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा
मृत नालसाब मुल्ला पूर्वी सध्या सत्तेत असलेल्या एका पक्षाचा कार्यकर्ता होता. त्याने नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. शिवाय त्याचा भाऊ मात्र सध्या विरोधात असलेल्या एका पक्षाचा कार्यकर्ता होता. त्यामुळे या खुनाला राजकीय वादाची किनार आहे का याचाही तपास पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.