सांगलीच्या व्यापाऱ्याला 24 लाखांचा गंडा : पुण्यातील एकावर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
शहरातील एका इलेक्ट्रीक व्यापाऱ्याला दुप्पट नफा देण्याच्या आमिषाने ६१ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करून त्यातील ३७ लाख परत देऊन उर्वरित २४ लाख ५० हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुण्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल कैलासचंद्र जोशी (रा. एमजी रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना जुलै २०२१ ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत सांगलीतील टिळक चौक येथे घडली. याप्रकरणी राहुल अनंत काळेबेरे (वय ३५ रा. पेठभाग, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगलीतील पेठभाग परिसरात राहणाऱ्या राहुल काळेबेरे यांचा इलेकट्रीकलचा व्यवसाय आहे. त्यांची ओळख पुण्यातील संशयित अमोल जोशी यांच्याशी झाली होती.
जोशी याने न्यूकेम ग्रुप कंपनीचा प्रमुख असल्याचे सांगितले होते. या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास इलेकट्रीक साहित्याची खरेदी करून त्या साहित्याची विक्री करून झालेल्या नफ्यातील अर्धा नफा देण्याचे आमिष दाखवले होते. जोशींवर विश्वास ठेवून काळेबेरे यांनी एकूण ६१ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीतील ३७ लाख रुपये हे काळेबेरे यांना जोशीने परत दिले होते. उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
काळेबेरे यांनी जोशींकडे वारंवार पैशांची मागणी केली असता जोशी याने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काळेबेरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तब्बल २४ लाख ५० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी अमोल जोशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.