पुण्यातील 5 जणांविरोधात सांगलीत गुन्हा!
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फसवणूक प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून जादा परतावा देण्याच्या आमिषाने दोघांची दोन कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुण्यातील पाच जणांविरूद्ध सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल शंतनू सावंत , अनिरूद्ध अनिल सावंत (दोघे रा. किराडवाड, नानापेठ, पुणे), हर्षल अशोक साळुंखे, सेल्वी हर्षल साळुंखे, ललिता हर्षल साळुंखे (रा. लक्ष्मीनारायण मंदिर मंगळवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी शिंदे (वय ३४, रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र शिंदे यांना संशयितांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच गुंतविलेल्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी जमीनही नावावर करण्याचे आश्वासन दिले. शिंदे व त्याच्या मित्राने संशयितांकडे काही रक्कम गुंतविली. सुरूवातीला संशयितांनी फिर्यादीच्या मित्राला १२ लाखाचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून २ कोटी ११ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी पाच टक्के परतावा व जमीनही नावावर न करता फसवणूक केली.
या प्रकरणी शिंदे यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार अर्ज दिला. तत्कालीन सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत उपाधीक्षकांकडे अहवाल सादर केला. त्यानुसार आता 5 संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.