गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी बीट मार्शल वाहने, स्मार्ट बीट प्रणाली उपयुक्त ठरेल
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली : खरा पंचनामा
बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होईल. बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट ही यंत्रणा गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीचे लोर्कापण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली, मिरज सारख्या शहरात व उपनगरात काही अनुचित प्रकार घडल्यास या ठिकाणी बीट मार्शल दुचाकी वाहनांमुळे तात्काळ पोहचता येईल व तेथील परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. या बरोबरच शाळा, कॉलेज, उद्याने यासारख्या ठिकाणीही गस्त घालण्यासाठी या वाहनांचा अधिक चांगला उपयोग होईल.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने अधिकच्या आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. पोलीस यंत्रणेनेही जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी अधिक सक्षमपणे कारवाई करावी.
महापौर दिग्वीजय सुर्यवंशी व आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व या उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले, पोलीस महासंचालनालय कार्यालयाकडून 66 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. यापैकी 30 वाहनांना पी.ए. सिस्टीम, सायरन सिस्टीम, चारचाकी वाहनांप्रमाणे लाईट सिस्टीम बसवून बीट मार्शलसाठी 30 गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये 40 बीट मार्शल कार्यान्वीत करण्याचा मानस आहे. या बीट मार्शलना प्रत्येकी एक मोबाईल फोन देण्यात येत असून एक ठराविक मोबाईल नंबरही देण्यात येणार आहे. सांगली व मिरज शहरात प्रत्येक बीटसाठी एरिया विभागून देण्यात आला आहे. संबधित क्षेत्रातील सर्व आस्थापना, महत्वाच्या ठिकाणांची यादी तयार करून बीट मार्शलकडे देण्यात येणार आहे. प्रत्येक बीटमध्ये दिवसा 12 तासासाठी 2 अंमलदार व रात्री 12 तासासाठी 2 अंमलदार याप्रमाणे 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. बीट मार्शलकडील मोबाईल नंबर त्या त्या क्षेत्रातील आस्थापना व नागरिकांना देण्यात येणार आहेत. शहर विभागासाठी एकूण 35 बीट मार्शल व 4 ट्राफिक बीट मार्शल व एक महिला बीट मार्शल असे एकूण 40 बीट मार्शल असणार आहेत. सांगली, मिरज, जत, इस्लामपूर, तासगाव, विटा व आष्टा या शहरामध्ये बीट मार्शल सिस्टीम कार्यान्वीत करणार आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बीट मार्शल अंमलदार यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. तसेच बीट मार्शल अंमलदार यांना मोबाईल हॅण्डसेट व सिमकार्ड देणारे देणगीदार माधवराव महाबळ फाऊंडेशनचे समीर महाबळ व क्वालिटी पॉवर इलेक्ट्रीकल इक्वीपमेंट प्रा. लि. चे कार्यकारी संचालक विवेक मोरोने यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बीट मार्शल वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण केले. तद्नंतर या दुचाकी वाहनांची पोलीस अधीक्षक कार्यालय ते पुष्कराज चौक, राजवाडा चौक व परत पोलीस अधीक्षक कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.