शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखासह तिघांवर गुन्हा!
दामदुप्पटच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा
सांगली : खरा पंचनामा
शहरातील सह्याद्री ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीने एका वर्षात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांना ५५ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या प्रमुख सुजाता नंदकुमार इंगळे (रा. कर्नाळ रस्ता, काकानगर), मनोज अशोक पाटील (रा. आष्टा, ता. वाळवा ) आणि सचिन दादासाहेब यादव (रा. चोपडी, ता. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्या सुनीता गजानन मोरे (रा. चाणक्य चौक, सांगली) यांनी दिली आहे.
शहरातील बिपीन सुपर मार्केट तसेच कॉँग्रेस भवन नजीक संशयीतांनी सह्याद्री ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय थाटले होते. फिर्यादी सुनीता मोरे यांना तिघांनी विश्वासात घेवून कंपनीत पैसे गुंतविल्यास बारा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. कमी कालावधीत आर्थिक फायदा होत असल्याचे पाहून फिर्यादी मोरे यांनी त्यांच्या बँक खात्याच्या माध्यमातून तसेच रोख रक्कमेव्दारे संशयीतांकडे ३३ लाख रुपये गुंतविले. व्यवहार पारदर्शी असल्याचे दाखविण्यासाठी संशयीतांनी फिर्यादी मोरे यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या सुरक्षेपोटी त्यांचे बँक खात्याचे २९ लाख रुपये किंमतीचे चार धनादेश व नोटरी करुन दिली.
तसेच बजरंग तुकाराम पाटील आणि महेश पांडुरंग मासाळ यांनी देखील सह्याद्री ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणूक केली.
फिर्यादीसह तिघांना मिळून कंपनीने १५ लाख ५७ हजारचा परतावा दिला. परतावा दिल्यानंतर देखील बजरंग पाटील यांची १४ लाख तर महेश मासाळ यांचे १४ लाख ६० रुपये रक्कम कंपनीकडेच होती. सन २०२० साली तिघा गुंतवणूकदारांनी ७१ लाख २० हजाराची रक्कम कंपनीमध्ये गुंतवली होती. मात्र तीन वर्षानंतरही वारंवार पाठपुरावा करुनही १५ लाख ५७ हजाराच्या परताव्याव्यतिरिक्त काहीच रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिघांची एकूण ५५ लाख ६३ हजाराची फसवणूक झाल्याची फिर्याद काल रात्री उशीरा पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.