कोगनोळी टोल नाक्यावरील पुरावे बनावट : वकिलांचा दावा तपासाधिकार्यांनी फेटाळला
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीत बुधवारी बचाव पक्षाचे अॅड. प्रमोद सुतार यांनी कोगनोळी टोल नाका येथून सीसीटीव्ही फुटेज खोटे आणि बनावट असल्याचा दावा केला. परंतु त्यांचा दावा तत्कालीन सीआयडीचे उपअधीक्षक तथा तपासाधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी फेटाळून लावला.
अॅड. सुतार यांनी संशयीतांच्या बचावासाठी अनेक कोंडीत पकडणारे प्रश्न केले. त्यांचे सर्व दावे फेटाळून लावताना कुलकर्णी यांनी या गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे झाला असल्याचे सांगितले. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा खून झाला होता. या खटल्याची सुनावणी अंतीम टप्प्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तपास अधिकारी सीआयडीचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचा सरतपास घेतला. त्यानंतर आता बचाव पक्षाच्या वकीलांकडून उलटतपास सुरु आहे. अॅड. सुतार यांनी कोगनोळी टोल नाक्यावरील फुटेज देणारे ऑडिटर नरेंद्र जोशी यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून खोटा व बनावट पुरावा तयार करण्यात आला, त्याचा आमचे पक्षकार अनिल लाड आणि झाकीर पट्टेवाले यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी वापर करण्यात आल्याचा दावा केला. त्याचबरोबर टोल नाक्यावरील स्क्रीन शॉट हेही बनावट असल्याचे अॅड. सुतार म्हणाले.
मात्र त्यांचा पवित्रा तपास अधिकारी कुलकर्णी यांनी नाकारला. प्राथमिक तपासा दरम्यान तत्कालीन पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी ज्या वाहनाने आंबोली येथे गेले, त्या वाहनाचे स्क्रीन शॉट कोगनोळी टोल नाका येथून घेतलेले नाहीत. कारण सदरची वाहने वेळेपूर्वीच आंबोली येथे पोहोचल्याचे निदर्शनास येईल, म्हणून वाहनांचे टोल नाक्यावरील प्रवासादरम्यानचे पुरावे कागदपत्रात समाविष्ट केलेले नाहीत, असा आरोपही अॅड. सुतार यांनी केला, मात्र कुलकर्णी यांनी तो फेटाळून लावतांना कुलकर्णी यांनी हा तपास योग्य प्रकारे झाल्याचे ठणकावून सांगितले.
तपास कामी बाहेर जाताना वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते तसेच स्थानिक पोलिसांची मदत आवश्यक असते तशा नोंदी स्टेशन डायरीला कराव्या लागतात परंतु खोटा पुरावा तयार करायचा असल्यामुळे तशा नोंदी घेतल्या नाहीत, स्थानिक पोलिसांची मदत घेतली नाही, वरिष्ठांची परवानगी घेतली नाही, असा पवित्रा अॅड. सुतार यांनी घेतला. तोही कुलकर्णी यांनी नाकारला. दि. 8 नोव्हेंबर 2017 रोजी घटना घडली, तेव्हा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे पोलीस ठाण्यातच हजर होते, ही बाब टाळण्यासाठी पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी जप्त केली नाही, जप्त केलेला मुद्देमाल, नंबर , तारीख यामधील तफावत स्पष्ट होईल म्हणून सांगली शहर पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल रजिस्टर जप्त केले नाही, हा अॅड. सुतार यांचा दावाही कुलकर्णी यांनी स्पष्टपणे नाकारला.
अॅड. सुतार यांनी कुलकर्णी यांची उलट तपासणी घेत असताना त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली तर विशेष सरकारी वकील निकम यांच्याबरोबर अॅड. सुतार यांचीही शाब्दिक चकमक उडाली. यावेळी मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद भोकरे यांनी अॅड. निकम यांना सहकार्य केले. आता यापुढील सुनावणी दि.19 ऑगस्ट रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.