राज्य उत्पादन शुल्कमधील ठाणेदारांची ठाणी हलणार!
सहायक दुय्यम निरीक्षक, जवान यांच्या नेमणुका आता आयुक्त करणार
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील ठाणेदारांची ठाणी आता हलणार आहेत. या विभागातील गट क मधील कमर्चाऱ्यांच्या नेमणुका, पदस्थापना करण्याचे अधिकार आता आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापूर्वी या नेमणुका करण्याचे अधिकार ज्या-त्या जिल्ह्यातील अधीक्षकांना होते. याबाबतचा आदेश राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने देण्यात आले आहेत.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन सेवेतील गट अ, गट ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित), गट क आणि डमधील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कमधील गट क मधील सहायक दुय्यम निरीक्षक, जवान, वाहनचालक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने, पदोन्नतीने, प्रतिनियुक्तीने नेमणुका किंवा पदस्थापना याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी निश्चीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, पदस्थापना करण्याचे अधिकार आता राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांना दिले आहेत.
मात्र या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत बदली अधिनियमान्वये घोषित केलेले सक्षम प्राधिकारी निर्णय घेतील असेही या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबतचे अधिकार ज्या-त्या जिल्ह्यातील अधीक्षकांना होते. त्यामुळे अनेकांनी वशिल्याने तसेच अन्य मार्गाने आपली ठाणी मजबूत केली होती. आता मात्र वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ठाणेदारांची ठाणी आता हलणार असल्याची चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.