प्रेमसंबंध मान्य नसल्याने मुलीचा भोसकून खून : मंगरूळ चिंचणीतील घटना
बापास अटक : विटा पोलिसांची कारवाई
विटा : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीचे असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने तसेच तिने लग्नासाठी तगादा लावल्याने वडिलांनीच मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील मंगरूळ चिंचणी येथे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी विटा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत वडिलांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील संतोष जगन्नाथ जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तर मुलीचा भाऊ किरण संतोष जाधव याने फिर्याद दिली आहे.
श्रेया सध्या महाविद्यालयात शिकत होती. तिचे खानापूर तालुक्यातील कार्वे येथील रोहित निकम याच्याशी प्रेमसंबंध होते. श्रेयाच्या वडिलांना ते मान्य नव्हते. त्यातच श्रेयाने त्याच्याशी लग्न लावून देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता.
शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील भाजी कापण्याचा चाकूने तिचे वडील संतोष जाधव यांनी तिच्या छातीवर वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर संतोष जाधव यांच्याविरोधात विटा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संतोष जाधव यांना अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.