मिटकरी यांच्या ट्विटमुळे शिंदे गटात खळबळ!
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर अजितदादांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगूनही सर्वत्र बॅनर्स, पोस्टर्स लागले आहेत. या बॅनर्सची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची झोप उडाली आहे.
अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच अजितपर्व, असे श्री. मिटकरी यांनी म्हटलं आहे.
सध्या राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन पक्षांचे सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदे गटाचे सर्वच नेते आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत आहेत.
तर एकनाथ शिंदे हेच 2024 नंतरही मुख्यमंत्री असतील असे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. असे असताना अमोल मिटकरी यांनी ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. मिटकरी यांनी हे ट्विट करून शिंदे गटाची झोप उडवली आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त मिटकरी यांच्या ट्विटचीच चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.