एक्साईजच्या दोघांविरोधात मुंबईत आझाद मैदानात आंदोलन!
संचालक सुनील चव्हाण, अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्यावर कारवाई न झाल्यास उघडे हलगी आंदोलन : प्रभात हेटकाळे
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनिल चव्हाण यांनी सांगली जिल्ह्यात 2012 मध्ये झालेल्या भरती घोटाळ्यातील लोकांना क्लीन चिट दिली होती. त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी. सांगलीत उपाधीक्षक असताना विश्वजित देशमुख यांनी मयत व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. या दोघांना निलंबित करून दोघांची चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर कारवाई न झाल्यास उघडे हलगी आंदोलन करण्याचा ईशारा प्रभात हेटकाळे यांनी दिला आहे.
या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सत्यमेव जयते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समीर पठाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांनी सोमवारपासून मुंबईतील आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
सांगली जिल्ह्यात 2012 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन अधीक्षक श्री. कावळे असताना या भरतीमध्ये घोटाळा झाला. त्याची तक्रार केल्यानंतर त्या प्रकरणात श्री. सुनील चव्हाण यांनी चौकशी केली. त्यात कावळे यांना तसेच घोटाळा करून भरती झालेल्या लोकांना क्लीन चिट दिली. त्यामुळे सुनील चव्हाण यांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी करून त्यांच्यासह श्री. कावळे यांची चौकशी करण्यात यावी. याबाबत पुरावे देऊनही कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे स्टेट एक्साईजचे संचालक सुनील चव्हाण, तत्कालीन अधीक्षक कावळे यांची चौकशी सुरू करून चौकशी होईपर्यंत चव्हाण यांना निलंबित करावे अशी मागणीही हेटकाळे यांनी केली आहे.
सांगलीचे तत्कालीन उपअधीक्षक विश्वजित देशमुख यांनी मिरज तालुक्यातील समडोळी येथे हातभट्टीवर कारवाई केली होती. त्यात त्यांनी चक्क एका मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्याची फिर्याद आणि आरोपपत्र न्यायालयात दिले होते. त्यावेळी न्यायालयाने याबाबत कडक ताशेरे ओढले होते.
देशमुख यांच्या या कृतीबद्दल हेटकाळे यांनी मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यावेळी देशमुख यांना केवळ ताकीद देऊन सोडण्यात आले. शिवाय त्यांना अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. त्यांची पदोन्नती रद्द करून त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी हेटकाळे यांनी आंदोलन करताना केली आहे.
दरम्यान मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या आंदोलनानंतर हेतकाळे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, प्रधान सचिव तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. त्यावर कारवाई न झाल्यास आयुक्त कार्यालयासमोर उघडे हलगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.