तीन लाखांच्या बदल्यात आठ लाखांची वसुली!
सांगलीत सावकारासह तिघांवर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील खासगी सावकाराने शहरातील गॅरेज चालकास १० टक्के व्याजाने ३ लाख रुपयांचे कर्ज देऊन त्याच्याकडून व्याजापोटी तब्बल ८ लाख ५० हजाराची वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरमसाठ व्याज देवूनही मुद्दलाच्या ३ लाखासाठी अन्य दोघांच्या मदतीने त्याच्यामागे तगादा लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
युनूस उर्फ बबलू हमजा शेख (रा. जैन बस्ती, पेठभाग, सांगली), सैदुल रमजान मलिक (रा. गवळी गल्ली, सांगली) आणि सदरे आलम हाफिज अन्सारी (रा. गणेशनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाजीद दादामिया सय्यद (रा. गवळी गल्ली, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. की फिर्यादी वाजीद सय्यद यांचे पटेल चौकात सय्यद मोटर नावाचे गॅरेज आहे. 2017 मध्ये सय्यद यांनी गवळी गल्ली येथील मेट्रोप्लाझा येथे 16 लाख 35 हजारात फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी त्यांनी बांधकाम व्यावसायिक इम्रान मुल्ला यांना 5 लाख 25 हजार रुपये रोख दिले होते. उर्वरित रक्कम थोड्या दिवसांनी देण्याचे ठरले होते. मात्र व्यवसायात मंदी आल्याने सय्यद यांना ठरलेल्या मुदतीत पैसे देणे जमले नाही.
सय्यद ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात तेथेच त्यांचा मित्र सैदुल मलिक राहतो. संशयीत सैदुल याने त्याच्या ओळखीचा सावकार युनूस शेख हा दहा टक्के व्याजाने कर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यामुळे त्याच्याकडून 2017 मध्ये सय्यद यांनी 3 लाख रुपये घेतले. त्यावेळी सावकार शेख याने सय्यद याच्याकडून दोन कोरे धनादेश घेतले होते.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे वेळोवेळी सावकार युनूस शेख यास फिर्यादी सय्यद यांनी 2018 ते 5 जानेवारी 2023 अखेर 8 लाख 50 हजार रुपये दिले. परंतु 18 जानेवारी 2023 रोजी सावकार शेख याने फिर्यादी सय्यद यांच्या नावे 5 लाखाचा धनादेश बॅँकेत टाकला.
व्यवहार पूर्ण झाला असताना देखील सावकार शेख याने मुद्दलाचे तीन लाख देणे लागत असल्याचे सांगितल्याने फिर्यादी सय्यद यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावेळी सावकार शेख याने फसवणूक केल्याचे कबुल करुन एक लाख रुपये देण्याचे कबुल केल्याने सदर तक्रार फिर्यादी सय्यद यांनी मागे घेतली होती. परंतु त्यानंतर एक लाख रुपये न देता कोरा धनादेश सावकार शेख याने पुन्हा बँकेत टाकला. तसेच मुद्दलाचे 3 लाख देण्याचा पुन्हा तगादा लावला. ती रक्कम देण्यासाठी सावकार शेख याने सैदुल मलिक आणि सदरे आलम हाफिज अन्सारी यांच्या मदतीने पैसे देण्यासाठी दबाव टाकला असल्याचे वाजिद सय्यद यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.