समजूत काढूनही त्याने इमारतीवरून मारली उडी!
कोल्हापूर : खरा पंचनामा
शहरातील शाहू नाका परिसरातील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आर्यन राजेंद्र पाटील (वय १६, रा. बळवंतनगर, पाचगाव, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास घडली. नैराश्यातून त्याला बाहेर काढण्याचे पालकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आर्यन पाटील हा अकरावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील शिवाजी विद्यापीठात नोकरी करतात. गेल्या तीन-चार महिन्यांपासून नैराश्यात असलेल्या आर्यनवर उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी तो मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर गेला. शाहू नाका परिसरातील एका टर्फवर खेळल्यानंतर घरी जातो असे त्याने मित्रांना सांगितले.
मात्र, नऊ वाजले तरी तो घरी पोहोचला नसल्याने पालकांनी मित्रांकडे चौकशी केली. आर्यनचा मोबाइल बंद असल्याने वडिलांसह मित्रांनीही त्याचा शोध सुरू केला.
शाहू नाका ते शिवाजी विद्यापीठ मार्गालगत अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीजवळ तो विव्हळत असल्याचे आढळले. वडिलांनी विचारपूस केली असता, त्याने स्वत:हून चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचे सांगितले.
त्याला तातडीने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.