फसवणूक करून नेलेली दुचाकी जप्त, एकाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ येथील आरेवाडी येथे जाऊन येतो असे सांगून दहा महिन्यांपूर्वी एकाची फसवणूक करून नेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
शिवाजी जगन्नाथ मासाळ (वय ४०, रा. सलगरे रोड, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी खास पथक तयार केले होते. पथकाला मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील एका गॅरेजमध्ये एकजण दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचून मासाळ याला ताब्यात घेतले. त्या दुचाकीबाबत पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सिद्धनाथ (ता. जत) येथील मनगिनी माने याच्याकडून बिरोबा बनात जाऊन येतो असे सांगून दहा महिन्यांपूर्वी त्याची दुचाकी (एमएच १० सीझेड १७६४) फसवून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर दुचाकी जप्त करून मासाळ याला अटक करण्यात आली. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल येळेकर, आमसिद्ध खोत, अमर नरळे, हणमंत लोहार, संदीप नलवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.