राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी आता पैसे घेऊनच जा!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक राऊतवाडीला भेट देत आहेत. पर्यटकांसाठी खास आकर्षण असणाऱ्या राऊतवाडी धबधबा येथे पर्यटन विकास निधीतून स्वागत कमान, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वछतागृह, वनकर्मचारी व पोलिसांसाठी चौकी, संरक्षक कठडा आदी विकासकामे केली आहेत.
त्यामुळे या वर्षी प्रथमच धबधबा पाहण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. ग्राम परिस्थिती विकास समितीमार्फत लहान मुलांना पाच रुपये व महिला व पुरुष यांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. या मिळालेल्या निधीतून धबधबा परिसर स्वच्छता, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे, दुरुस्ती व देखभाल, स्वच्छतागृहात विजेची सोय, ग्राम परिस्थिती विकास समितीच्या वतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार आदींचा समावेश असणार आहे. तसेच पार्किंगसाठी मोटारसायकल १० रुपये व चारचाकी वाहनास २० रुपये आकारण्यात येणार आहेत.
या ठिकाणी तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते. पण, आता वनकर्मचारी तसेच पोलिस चौकी उभा केल्याने पोलिस व वनकर्मचारी यांची हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर करडी नजर राहणार आहे. माफक प्रवेश शुल्क मोजावे लागले तरी सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांना धबधब्याचा आनंद घेता येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.