जयसिंगपूरच्या प्राध्यापकाला अॅट्रॉसिटीची धमकी देत मागितली 19 लाखांची खंडणी!
बारामती : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील प्राध्यापकाला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडे 19 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद मानसिंग माने (रा. सातव चौक, बारामती) व नीलेश पवार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रूपाली संदीप तापकीर (रा. वैष्णवी अपार्टमेंट, तांदूळवाडी रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
रुपाली यांचे पती संदीप हे जयसिंगपूर येथे प्राध्यापक आहेत. ते सुट्टीच्या दिवशी बारामतीत येतात. त्यांच्या मालकीचे हॉटेल स्वराज असून, फिर्यादी व दीपाली विनोद माने यांच्यात ते भागीदारीत चालविले जाते. गेल्या नऊ महिन्यांपासून माने यांनी फिर्यादीला करारानुसार भाडे दिलेले नाही. दि. 13 ऑगस्ट रोजी रात्री तापकीर हे हॉटेलमध्ये असताना त्यांना मित्राचा व्हिडीओ कॉल आला.
ते मित्राला व्हिडीओद्वारे हॉटेल दाखवत असताना किचनमध्ये गेले. तेथे एक महिला काम करत होती. तिने तुम्ही किचनमध्ये कसे आलात, अशी विचारणा केली. त्यावर तापकीर यांनी मी हॉटेलचा मूळ मालक असल्याचे तिला सांगितले. त्यावर तिने त्यांची माफी मागितली होती. दरम्यान, दि. 14 रोजी त्यांना बारामती शहर पोलिस ठाण्यातून बोलावणे आले. तापकीर पती-पत्नी तेथे जात असताना कचेरी रस्त्यावर कमानीच्या बाहेर माने व पवार हे त्यांना भेटले.
हॉटेलमधील महिला कामगार तुमच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करणार आहे. तिला देण्यासाठी 1 लाख व आम्हा दोघांना 18 लाख रुपये असे 19 लाख रुपये दिले तर ही केस मागे घेण्यास सांगेन, असे ते म्हणाले. तापकीर यांनी एवढी रक्कम माझ्याकडे नसल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही पैसे न दिल्यास आत जाल. तुमची नोकरी जाईल, अशी धमकी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.