इचलकरंजीतील शंकरराव पुजारी बँकेत साडेतीन कोटींचा घोटाळा!
सांगलीतील 5 जणांसह 19 जणांवर गुन्हा : 14 जणांना अटक
इचलकरंजी : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेत 2020 ते 2022 या आर्थिक वर्षात पदाचा दुरुपयोग करत संचालक मंडळानं तब्बल 3 कोटी 58 लाख 37 हजारांचा अपहार केल्याचं लेखापरिक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी धोंडीराम आकाराम चौगुले (रा. कोल्हापूर) यांच्या फिर्यादीनुसार बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह 19 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये शाखाधिकारी मलकारी आप्पासो लवटे, कर्जविभाग प्रमुख राजेेंद्र गणपती जाधव, शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य, पासिंग ऑफिसर सुरेखा जयपाल बडबडे, शिपाई अभिजित मल्हारी सोलगे, कॅशियर वैभव बाळगोंडा गवळी, क्लार्क निलेश शिवाजी दळवी, शिपाई विजय परशराम माळी (सर्व रा. इचलकरंजी), वरिष्ठ व्यवस्थापक रावसाहेब महादेव जावळे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), ज्युनिअर ऑफिसर मारुती कोंडीबा अनुसे (रा. माले मुडशिंगी), कॅशियर रोहित बळवंत कवठेकर (रा. निंबळक, ता. तासगांव), क्लार्क सर्जेराव महादेव जगताप (रा. येडेमच्छिंद्र, जि. सांगली), आयटी मॅनेजर शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी), शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम (रा. पलूस, ता. सांगली), शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील (रा. जयसिंगपूर), शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे (रा. तासगांव), क्लार्क सारीका निलेश कडतारे (रा. सरनोबतवाडी), बँकेच्या अध्यक्षांच्या पत्नी कांचन पुजारी यांचा समावेश आहे.
यापैकी बँकेचे अध्यक्ष प्रकाश शंकरराव पुजारी (रा. आवाडे अपार्टमेंट मागे, इचल.) यांच्यासह 14 जणांना पोलिसांनी अटक केली. दिवस पोलीस कोठडी सुनावलीआहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँकेच्या प्रशासकांनी कोल्हापूरचे चार्टर्ड अकौटंट धोंडीराम चौगुले यांना नूतन बँकेच्या 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक 2 वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त केलं होतं. त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणात बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह संचालक आणि अधिकार्यांनी कर्ज येणं असताना बनावट निरंक दाखले दिलेत. कर्ज येणं असताना बेकायदेशीर उचल दिली आणि कर्जामध्ये बेकायदेशीर सुट दिली. बँक स्टाफला बेकायदेशीरपणे बनावट व्हौचरवर अॅडव्हान्स दिले असून बँकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीस नियमबाह्य कर्जही दिलंय. कर्जाचे दस्तऐवज न ठेवता आणि संचालक मंडळाची मंजूरी न घेता कर्ज वाटप केलंय.
एकुणच बँकेच्या प्रधान कार्यालय आणि सहकारनगर, पलूस, सांगली, इस्लामपूर शाखेत पदाचा दुरुपयोग करत 2 वर्षात संगनमतानं एकूण 3 कोटी 58 लाख 37 हजाराचा अपहार केल्याचं लेखापरिक्षणात स्पष्ट झालंय. याप्रकरणी चार्टर्ड अकौंटंट चौगुले यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्यासह 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
यापैकी अध्यक्ष प्रकाश पुजारी, मलकारी लवटे यांच्यासह 14 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्यांपैकी कांचन पुजारी, सुरेखा बडबडे, सारीका कडतारे, सर्जेराव जगताप, राहुल पाटील यांचा पोलीस शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.