उमदीत विद्यार्थ्यांना विषबाधा : संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा!
सांगली : खरा पंचनामा
जत तालुक्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणी अखेर तीन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचा सचिव, दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षक यांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचा सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधिक्षिका अक्कमहादेवी सिध्धन्ना निवर्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी फिर्याद दिली आहे.
दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास येताच त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. यामध्ये 168 मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत वरीष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सांगलीत पाठवले. चौकशी, तपासणी झाल्यानंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर फिर्याद दिली.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेर जेवण बनवून शिल्लक जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये संशयितांनी निष्काळजीपणा, हयगय केली. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवितास, वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणल्याची कृती केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.