एटीएम फोडणाऱ्या हरियाणातील टोळीला थरारक पाठलाग करून केले जेरबंद!
6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबी, विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
एटीएम फोडणाऱ्या हरियाणा येथील तिघांच्या टोळीला थरारक पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. विटा-तासगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून करमाळा येथील गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. एलसीबी आणि विटा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली, अशी माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सैफुल दुल्ली खान (वय 37), निसीयूम नियाज अहमद (वय 24), हसन रेहमान (वय 53, सर्व रा. हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी एलसीबी आणि विटा पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहेत. सोमवारी विटा-तासगाव रस्त्यावर एका टेंपोमधून चोरटे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना खबऱयाद्वारे माहिती मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पथक गस्त घालत असताना विटा-तासगाव रस्त्यावर एक आयशर टेंपो (क्र. एचआर 74 ए 5030) येताना दिसला. या वाहनाची शंका आल्याने पथकाने त्याला थांबवण्याचा इशारा केला. मात्र तो टेंपो न थांबता निघून गेला. त्यानंतर पथकाने थरारक पाठलाग करून हा टेंपो पकडला.
त्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले. टेंपोच्या केबिनची झडती घेतल्यानंतर त्यात वेल्डिंग सिलिंडर, गॅस कटर, 2 चाकू सापडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी एटीएम फोडण्यासाठी हे साहित्य वापरल्याची कबुली दिली. शिवाय करमाळा (जि. सोलापूर) येथील एटीएम फोडल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
विट्याच्या पोलिस उपाधीक्षक पद्मा कदम, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विट्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल येळेकर, कुमार पाटील, अधिक खाडे, सुनील पाटील, हेमंत तांबेवाघ, किरण खाडे, गिरीष मोरे, गणपत गावडे, अक्षय जगदाळे, विशाल पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.