कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणाऱ्यास 9 वर्षे सक्तमजुरी!
सांगली : खरा पंचनामा
कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड करुन सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख 10 हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी एका तरुणाला नऊ वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.
राजा उर्फ राजू नागेश कोळी (वय २०, रा. काळीवाट, हरिपूर रस्ता, सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या घटनेमध्ये दोन आरोपी असून यातील दिपक आबा ऐवळे (आवळे) याचे खटल्याचे कामकाज सुरु असताना मृत्यू झाला आहे. फिर्यादी हे दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी अकराच्या सुमारास पोकलॅड मशीन घेवून तुरची फाटा येथे निघाले होते. त्यावेळी एक संशयीत हा पोकलॅँड असलेल्या ट्रेलरच्या केबीनमध्ये जबरदस्तीने घुसला. काही वेळातच त्याच्या साथीदाराने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादीस मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी आणि त्याचा भाऊ यांनी याचा प्रतिकार केला.
यावेळी संशयीतांनी फिर्यादीच्या वाहनाची तोडफोड केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून अडीच तोळ्याची सोन्याची चेन, 45 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 10 हजारांची रोकड असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. यावेळी जीव वाचविण्यासाठी फिर्यादी हा जवळच असलेल्या एका घरात लपला. मात्र तेथे येऊन संशयीतांनी दमदाटी केली. यावेळी परिसरातील नागरिक जमल्याने फिर्यादीच्या वाहनाची तोडफोड करुन संशयीत तेथून पसार झाले.
याबाबतचा गुन्हा तासगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरिक्षक आर. आर. साळोखे यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकारपक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन न्या. शर्मा यांनी राजू कोळी यास नऊ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.