सराईत आंतरजिल्हा चोरट्याला : अटक सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
तब्बल ९ गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा चोरट्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, दोन दुचाकी असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल ९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
लोहेश ऊर्फ तोया पितांबर शिंदे (वय २८, रा. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकाला वाळवा-बोरगाव रस्त्यावरील एका वीटभट्टीजवळ लोहेश शिंदे चोरीचे दागिने, दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचला होता.
लोहेश शिंदे तेथे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आल्यानंतर पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी दुचाकी तेथेच सोडून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठेच लागून पडल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४, कुंडल पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन, लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, मोबाईल, दोन दुचाकी असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला कुंडल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, युवराज सरनोबत, अरूण पाटील, सचिन धोत्रे, उदय माळी, सुनील जाधव, विवेक साळुंखे, अजय साळुंखे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.