ऑनलाईन फसवणुकीचे ६५ हजार रूपये तक्रारदारास दिले परत!
सांगली सायबर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने एकाला ६७ हजारांना गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी सांगलीच्या सायबर पोलिस ठाण्याने तातडीने कारवाई करत त्यातील ६५ हजार रूपये तक्रारदारास परत देण्यास यश आल्याची माहिती सायबरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
सांगलीतील यशवंतनगर येथील भाग्येश दबडे यांना अनोळखी व्यक्तीने मोबाईल संपर्क साधला. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिषही दाखवले. त्यानंतर दबडे यांच्याकडून विविध बॅंकांच्या खात्यामध्ये ६७ हजार रूपये भरण्यास सांगितले. ही घटना दि. १० ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर दबडे यांना त्याचा परतावा मिळाली नाही. त्यांनी याबाबत सांगलीतील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत ती रक्कम परत मिळवण्यात य़श मिळवले.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर प्रतिसाद देऊ नये, आपल्या बॅंक खात्याची माहिती देऊ नये. इमेल अथवा अन्य सोशल मिडियाद्वारे येणाऱ्या लिंक ओपन करू नयेत. मोबाईलमध्ये कोणतेही एप डाऊनलोड करू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक हारूगडे यांनी केले आहे.
निरीक्षक हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.