विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा गुन्हेगारांना सलग दुसरा दणका!
सांगलीतील मलमे, कोल्हापुरातील केदार गॅंगविरोधात मोकाची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याची मोहीम तीव्र केली आहे. नुकतीच त्यांनी सांगली जिल्ह्यातील स्वप्नील मलमे टोळीवर मोकाअंतर्गत कारवाईला मंजुरी दिली आहे. शिवाय त्यांनी कोल्हापूर शहरातील केदार घुरके टोळीतील दहाजणांवर मोकाची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी गुन्हेगारांविरोधात उघडलेल्या या मोहीमेमुळे परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी होणार आहे.
केदार भागोजी घुरके (वय २४, रा. लक्षतीर्थ, कोल्हापूर), राजू सोनबा बोडके (वय ३२, रा. लक्षतीर्थ), युवराज राजू शेळके (वय २१, रा. कदमवाडी, सध्या रा. लक्षतीर्थ), कृष्णात कोंडीराम बोडेकर (वय २७, रा. लक्षतीर्थ), करण राजू शेळके (वय १९, रा. लक्षतीर्थ), राहुल सजेर्राव हेगडे (वय २४, रा. लक्षतीर्थ), चिक्या ऊर्फ विकास बंडोपंत भिऊंगडे (वय ३२, रा. लक्षतीर्थ), तानाजी धोंडीराम कोळपटे (वय २६, रा. फुलेवाडी), सत्यजित भागोजी फाले (वय १९, रा. फुलेवाडी), राजू मधू बोडेकर (वय ३०, रा. फुलेवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ, बोंद्रेनगर परिसरासह शहर परिसरात गेल्या काही वर्षांपासून वर्चस्व मिळवण्यासाठी संतोष बोडके आणि केदार घुरके यांच्या टोळीमध्ये वारंवार वाद उफाळून येत होता. त्याशिवाय केदार टोळीने कोल्हापूर शहरातील प्रकाश बोडके याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. केदार टोळीवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जाळपोळ, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, घरफोडी, विनयभंग, दंगल माजविणे असे २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार मोकाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सतीश गुरव यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला श्री. फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. याचा पुढील तपास कोल्हापूर शहरचे उपअधीक्षक अजित टिके करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.