अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा!
सांगली : खरा पंचनामा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनावण्यात आली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरून ही शिक्षा सुनावण्यात आली. शिवाय पीडित मुलीस २५ हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ही रक्कम न दिल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहीले.
राजेबाकसर राजेसाब पिरजादे (वय ५९, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पिरजादे सुतारकाम करत होता. या कामानिमित्त त्याचे पीडित मुलीच्या घरी येणे-जाणे होते. आक्टोबर २०१९ मध्ये पीडित मुलीच्या आईने घरातील कामासाठी पिरजादे याला घरी फोन करून बोलावले होते. त्यावेळी त्याने अल्पवयीन पीडित मुलीवर अतिप्रसंग केला. त्यावेळी मुलगी जोरात ओरडत होती. त्यानंतर मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तिच्या वडिलांना बोलावून घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पिरजादे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी केला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, पिडितेचा तसेच तिच्या आईचा जबाब नोंद करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. याच्या आधारे न्या. हातरोटे यांनी पिरजादे याला दोषी धरून त्याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.