तक्रारीची दखल न घेता मिळकतीची बेकायदा नोंद!
सिटी सर्व्हेचा कारभार : सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार : अशोकराव मासाळे
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील टिंबर एरियात माझ्या मालकी, वहीवाहिटीची सामाईक मिळकत आहे. त्यातील काही मिळकत एकाने बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे. याबाबत महापालिकेकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. या मिळकतीबाबत दिवाणी दावाही न्यायप्रविष्ठ आहे. या मिळकतीच्या विक्रीबाबत तक्रार अर्ज करूनही त्याची दखल न घेता सिटी सर्व्हे कार्यालयाने मिळकतीची बेकायदा नोंद घातली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती सांगली शहर काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव मासाळे यांनी दिली.
मासाळे म्हणाले, टिंबर एरियात असलेल्या माझ्या मालकीची सामाईक मिळकतीमध्ये तुकडेजोड, तुकडेबंदी कायद्याची बाधा येते. या मिळकतीसंदर्भात फेब्रुवारी २०२२ मध्ये सिटी सर्व्हे कार्यालयात तक्रार अर्ज दिली होता. या मिळकतीबाबतचा दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र तेथील अधिकारी ज्योती पाटील तसेच तत्कालीन वरीष्ठ लिपीक सुनील पाटील यांनी आर्थिक तडजोड करून मिळकतीची बेकायदेशीरपणे नोंद घातली आहे असाही आरोप मासाळे यांनी केला आहे.
सांगलीतील सिटी सर्व्हे कार्यालयात एजंटांची संख्या वाढली आहे. तेथील अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाही. तसेच जे तेथे उपस्थित असतात ते नेहमीच सर्व्हर डाऊन असल्याची कारणे सांगतात. सामान्य नागरिकांची पिळवणूक केली जाते. अधिकाऱ्यांशी संगनमत करून एजंट नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे. वारसनोंदी, हक्कसोडपत्र याची कामे करताना टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांनी दिलेली कागदपत्रे गहाळ केली जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दखल घेऊन अधिकारी ज्योती पाटील, तत्कालीन लिपीक सुनील पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही मासाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.