'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?
मुंबई : खरा पंचनामा
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
'सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे. सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे, असे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.