साठ लाखाची फसवणूक झालेला तक्रारदार गायब!
मिरज : खरा पंचनामा
बॅंकेकडून 2 कोटी कर्जाचे प्रकरण मंजूर करून देतो असे म्हणत 60 लाख रुपयांची फसवणूक झालेली व्यक्तीच तीन दिवसांपासून गायब झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदारच गायब झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
रमेश वीरभद्र किवटे असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रमेश यांचा मुलगा ओंकार यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रमेश किवटे यांचे घरालगत शिवलीला ज्वेलर्स नावाचे दागिने खरेदी-विक्रीचे दुकान आहे. 2022 मध्ये चार जणांनी किवटे यांना बँकेचे दोन कोटी रुपयांचे कर्ज करून देतो असे सांगितले. त्यासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागेल असे म्हणून त्यांच्याकडून 67 लाख 50 हजार रुपये घेण्यात आले.
बँकेची फी भरूनही किवटे यांना कर्ज मिळाले नाही. तसेच 67 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत 2020 मध्ये मिरज शहर पोलिसात चौघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये सचिन व्यंकटेश देशपांडे, अजय भंडारे उर्फ अभिषेक पवार, मिथुल त्रिवेदी तसेच अभिषेक पवार याची पत्नी यांचा समावेश आहे.
मिरज शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्रिवेदी याच्याकडून साडेसात लाख रुपये वसूल करून किवटे यांना मिळवून दिले. उर्वरित पैसे आजतागायत मिळाले नाहीत. पैसे मिळत नसल्यामुळे किवटे निराश झाले होते. ते दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता घरातून मित्राला भेटण्यासाठी बाहेर पडले मित्राला भेटले त्यानंतर घरी परतलेच नाहीत असे तक्रारीत म्हटले आहे.
तब्बल 67 लाखांची फसवणूक झालेला फिर्यादी गायब झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. याच्या मुळाशी जाऊन संशयितांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.