पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करा!
पत्रकारांची मागणी : कायद्याची गांधी पुतळ्यासमोर प्रतिकात्मक होळी
सांगली : खरा पंचनामा
पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी करा, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोरयाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा, आशा मागण्यासाठी सांगलीतील पत्रकारांनी आज निदर्शने केली, येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर पत्रकार संरक्षण कायदयाची प्रतिकात्मक होळी करून घोषणाबाजी केली.
पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरूवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे मराठी पत्रकार परिषेदेश संलग्न सांगली जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल पत्रकार परिषद यांनी निदर्शने केली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर म्हणाले, " महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे, हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना, धमक्या, शिविगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांचा मनात उरली नाही. सांगली जिल्ह्यात सुद्धा दोन प्रकरणे घडली, ज्या अजून आरोपी मोकाट आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत."
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले, "पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली आणि दुसरया दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे.,असे असले तरी मारहाण करणारया गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणारया आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही, पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील ७५ टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे, मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात, असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत, हे थांबलं पाहिजे, "
यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, हल्ला विरोधी संघाचे अध्यक्ष गणेश कांबळे, डिजिटल मीडिया अध्यक्ष तानाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, प्रकाश वीर, उदयसिंग राजपूत, चंद्रकांत गायकवाड, विकास सूर्यवंशी, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, किशोर जाधव, किरण जाधव, दारिकांत माळी आदींसह विविध दैनिक आणि माध्यमांचे पत्रकार यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.