दुचाकी, ट्रॉली चोरणाऱ्या पाचजणांना अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाच गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून दुचाकी तसेच ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या पाचजणांच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी, एक ट्रॉली असा तब्बल ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
बसवराज बाळाप्पा नाईक (वय २४), ओंकार विष्णू नाईक (वय २१, दोघेही रा. शिवाजीनगर, पलूस, मूळ रा. बोलवाड), ओंकार महेश तांदळे (वय १९, रा. बेडग), सिद्धार्थ पांडुरंग खोत (वय २१), विश्वजित गिरजाप्पा खोत (वय २०, दोघेही रा. विठुरायाचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते.
हे पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना ओंकार नाईक आणि बसवराज नाईक यांनी चोरलेल्या दुचाकी बोलवाड (ता. मिरज) येथे ठेवल्याची माहिती पथकातील उपनिरीक्षक कुमार पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बोलवाड येथे धाव घेतली. तेथे एका घरासमोर दुचाकी सापडल्या. घरातून आलेल्या दोन तरूणांकडे त्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी त्या दुचाकी सांगली, कुपवाड येथून त्या चोरल्याची कबुली दिली. तसेच पथकाला म्हैसाळ उड्डाण पुलाजवळ ओंकार तांदळे चोरीची गाडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने म्हैसाळ येथून गाड्या चोरल्याची कबुली दिली.
तसेच पथकाला कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील सिद्धार्थ, विश्वजित खोत यांनी ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून आणली असून त्याच्या विक्रीसाठी ते आल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तो ट्रॅक्टर कर्नाटकातील कुडची येथून चोरल्याची कबुली दिली. सर्व संशयितांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, आमसिद्ध खोत, अमर नरळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, अजय बेंद्रे, सुनील जाधव, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.