मुर्तीकाराकडील रोकड लुटणाऱ्या एकास अटक, एक पसार
दोन दुचाकींसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली : खरा पंचनामा
बॅंकेत सहा लाखांची रोकड भरण्यासाठी जाणाऱ्या मुतीर्काराच्या मोपेडला लाथ मारून त्याला खाली पाडून त्याच्याकडील रोकड लुटणाऱ्या एकास अटक करण्यात आली. तर यातील एक संशयित पसार झाला आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मी मंदिराजवळ घडली होती. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी, एक लाखांची रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजअहमद मेहबूब शेख (वय २२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर यातील दुसरा संशयित सूरज काळे पसार झाला आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी अक्षय सूर्यवंशी (वय २६, रा. जुना बुधगाव रोड) मोपेडवरून (क्र. एमएच १० डीएफ ११५१) सहा लाखांची रोकड बॅंकेत भरण्यासाठी निघाला होते. त्यावेळी लक्ष्मी मंदिराजवळ संशयितांनी त्याच्या मोपेडला लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याच्याकडील रोकड आणि मोपेड घेऊन संशयित पसार झाले होते. या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याच्या सूचना वरीष्ठांनी दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष पुजारी यांना ही चोरी संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. यातील संशयित संजयनगर येथील एका शाळेजवळ येणार असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सूरज काळे याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून सूर्यवंशी यांची मोपेड तसेच एक दुचाकी (क्र. एमएच १० सीई ३०१३), एक लाखांची रोकड असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, व्ही. एस. साळुंखे, संतोष पुजारी, सूरज सदामते, राहुल गोसावी, दशरथ शेजाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.