Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्याद्वारे विमा कंपनीला एक कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न! पोलिसासह सहाजणांना अटक : कोल्हापूर सीआयडीची कारवाई

नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्याद्वारे विमा कंपनीला एक कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न!
पोलिसासह सहाजणांना अटक : कोल्हापूर सीआयडीची कारवाई



कोल्हापूर : खरा पंचनामा

भुदरगड तालुक्यातील कूर येथे मुरगूड रस्त्यावर बुलेट घसरून झालेल्या अपघातात संजय बाबुराव खोत यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस हवालदार भिकाजी बचाराम देसाई तपास केला होता. याच्या तपासात खोटी कागदपत्रे तयार करून तसेच साक्षीदार उभे करून बुलेट चालकावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खोत यांच्या वारसांनी टाटा एआयजी कंपनीविरोधात एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मोटार अपघात प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. या अपघाताबाबत शंका आल्याने विमा कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास कोल्हापूर येथील सीआयडीच्या पथकाने केला. त्यात खोटी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

पोलिस हवालदार भिकाजी बचाराम देसाई, रूपाली संजय खोत, अमेय ऊर्फ अमित संजय खोत, बाबुराव सदाशिव खोत, विजय शंकर पाटील, प्रसाद शामराव पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्व संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल २०१९ मध्ये संजय खोत बुलेटवरून (एमएच ०९ ईएस ६६०४) जात असताना आदमापूरजवळ बुलेट घसरून ते जखमी झाले होते. कोल्हापुरातील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याचा तपास भुदरगड पोलिस ठाण्याकडील हवालदार भिकाजी देसाई करत होते. मृत खोत शासकीय सेवेत होते. त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी खोत कुटुंबियांनी हवालदार देसाई यांच्याशी संगनमत केले.  

त्यानंतर मृत खोत आणि त्यांचा मेहुणा विजय शंकर पाटील (रा. मडिलगे बुद्रुक) हे दोघे मुरगूडहून मुदाळ तिट्टा येथे जात असताना आदमापूरजवळ कुत्र्यांचा घोळका आडवा आला. त्याला धडकून बुलेटचा अपघात झाला. त्यावेळी बुलेटवर पाठीमागे बसलेले संजय खोत यांचे रस्त्यावर डोके आपटल्याने ते जखमी झाले. अशी फिर्याद खोत यांचा भाचा प्रसाद शामराव पाटील (रा. सरवडे, ता. राधानगरी) याने भुदरगड पोलिस ठाण्यात दिली. त्याप्रमाणे खोटे साक्षीदार तयार केले. तसेच कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली. नंतर विजय शंकर पाटील याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. दरम्यान मृत खोत यांची पत्नी रूपाली, मुलगा अमेय ऊर्फ अमित, वडील बाबुराव खोत यांनी अपघातातील एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी टाटा एआयजी कंपनी आणि इतरांविरोधात कोल्हापूर येथील मोटार अपघात दावे प्राधीकरणकडे दावा दाखल केला होता. 

याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने या अपघाताची चौकशी सीआयडीमार्फत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सीआयडीच्या कोल्हापूर येथील पथकाने दाव्याची चौकशी केल्यानंतर अपघातातील चालक बदलल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहाही संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. 

सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाग्यश्री पाटील यांनी याचा तपास केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक उदय देसाई करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.