३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा!
ना हरकत दाखल्यासाठी मागितली रक्कम; सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
घराचे मूल्यांकन करून खरेदी-विक्रीचा ना हरकत दाखला देण्यासाठी ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बुधगावच्या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली.
उमेश नवाळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नवाळे हा नांद्रे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याच्याकडे बुधगावचाही अतिरिक्त कार्यभार होता. तक्रारदार यांच्या राहत्या घराचे मूल्यांकन करून खरेदी-विक्रीचा ना हरकत दाखला देण्यासाठी नवाळे याने तक्रारदाराकडे ४० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने दि. २८ आगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या तक्रारीची तीनदा पडताळणी केल्यानंतर नवाळे याने दाखला देण्यासाठी सुरुवातीला ४० हजार नंतर ३० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नवाळे याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सलीम मकानदार, धनंजय खाडे, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सुदर्शन पाटील, अनिस वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.