मानवी वाहतूक, तस्करीप्रकरणी महिलेसह एकाला पश्चिम बंगालमधून अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बांग्लादेशी मुली, तरूणींना बेकायदेशीररित्या सांगली, मिरजेत आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेसह एकाला पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मानवी तस्करी, वाहतुकीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
रूपा ऊर्फ सपना अबुलकासीम शेख (वय ३९, सध्या रा. उत्तमनगर, मिरज, मूळ रा. हातीया बाझार, बांग्लादेश), कालू ऊर्फ खालीक रियाजुद्दीन मंडल (वय ४७, रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बांग्लादेशी मुलींना बेकायदेशीरपणे सांगली, मिरज परिसरात आणून त्यांना वेश्या करण्यास भाग पाडणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
मिरजेतील उत्तमनगर येथे राहणारी रूपा नामक महिला सपना या नावाने वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने मूळची बांग्लादेश येथील असल्याचे सांगितले. तसेच तिच्या चौकशीत गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिने कालू याच्या मदतीने बांग्लादेश येथील एका पिडित मुलीस सांगलीत आणल्याचेही स्पष्ट झाले.
त्यानंतर कालूच्या शोधासाठी एक पथक पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद येथे पाठवण्यात आले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने बांग्लादेश येथील मुलींना बेकायदा सांगली, मिरजेत आणल्याची कबुली दिली. त्याला सांगलीत आणण्यात आले आहे. या दोन्ही संशयितांकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, संजय कांबळे, इम्रान मुल्ला, प्रतीक्षा गुरव, अभिजित गायकवाड, महेश गायकवाड, संग्राम गायकवाड, अनिता गायकवाड, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.