Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील एकाला अटक! एलसीबीची कारवाई

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील एकाला अटक!
एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावरील सशस्त्र दरोड्याप्रकरणी बिहार येथील एकाला अटक करण्यात आली आहे. या दरोड्यातील टोळीतीस सदस्यांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करू अशी माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय २५, रा. तारवान, जि. पाटणा, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दि. ४ जून रोजी भर दुपारी सात ते आठजणांच्या टोळीने मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करत पिस्तूलाच्या धाकाने दुकानातील तब्बल सात ते आठ कोटींचे दागिने, महागडे हिरे, रोकड लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला होता. त्यानंतर दरोडेखोर टाटा सफारी (क्र. एमएच ०४ ईटी ८८९४) या गाडीतून तसेच दोन दुचाकीवरून ते पसार झाले होते. 

ही घटना घडल्यानंतर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेल्या तीनही गाड्या मिरज, भोसे या ठिकाणी सापडल्या. घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांची विविध पथके कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडीसा येथे पाठवली होती. याचा सखोल तपास केल्यानंतर बिहारमधील टोळीने हा दरोडा टाकल्याची माहिती तसेच दरोडेखोरांची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने बिहार येथे वीस दिवसांहून अधिक दिवस ठाण मांडून अंकुरप्रताप सिंग याला अटक केली. त्याच्याकडे कसून तपास सुरू असून त्याच्या अन्य साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, संदीप वाघमारे, उपनिरीक्षक कुमार पाटील, उपनिरीक्षक अकिब काझी, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, अजय बेंदरे, आर्यन देशिंगकर, संदीप घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.