राज्यामध्ये नवीन टीम करायची आहे, सर्वांनी जोमाने कामाला लागू!
अजित पवारांचा सांगलीतून कानमंत्र
सांगली : खरा पंचनामा
राज्यामध्ये आता आपल्याला नवीन टीम करायची आहे. त्यामुळे आता सर्वांनी जोमाने कामाला लागू. वैभव पाटलांना माझ्यापासून मी कधीही अंतर पडू देणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या सभेसाठी जात असताना पुणे-बंगळुरू महामार्गावरील केदारवाडी फाटा येथे वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्या आयोजित केलेल्या सत्कार आणि स्वागत समारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी वैभव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यासह अजित पवार यांचे स्वागत केले.
राष्ट्रवादीत अजित पवार गटाने केलेल्या बंडानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्याचे चित्र आहे. माजी आमदारांनी शरद पवार गटासोबत राहणे पसंत केल्याचे दिसून येतंय तर वैभव पाटील यांनी उघडपणे भूमिका घेत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सदाशिवराव पाटील यांच्या कुटुंबात दोन गट
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल जिल्हाभरातील पदाधिकाऱ्याची बैठक घेतली होती. या बैठकीत सदाशिवराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सदाशिवराव पाटील शरद पवार गटासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे वैभव पाटील मात्र अजित पवार गटात गेल्याने वैभव पाटील यांचा गट रिचार्ज झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर सभेसाठी जात असताना पवार यांचा ताफा पुणे-बंगळुरु महामार्गावरून केदारवाडी मार्गे कोल्हापूरला गेला. सांगली जिल्ह्यात आजित पवार यांच्या स्वागताची जबाबदारी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती.
महाडिक यांच्याकडूनही स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला सभेसाठी जाताना इस्लामपूर जवळील पेठ नाका मध्ये स्वर्गीय नानासाहेब महाडीक यांच्या समाधीस अभिवादन करण्यास थांबले होते. महाडिक हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. आणि राहुल आणि संग्राम महाडिक हे सध्या भाजपत आहेत. मात्र, अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून महाडिक गटातील राहुल महाडिक यांची अजित पवारांसोबत जवळीक वाढली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.