आताचे राज्यकर्ते म्हणतात लुटा, पण आमचा वाटा टाका!
कोल्हापूर : खरा पंचनामा
छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी रयतेच्या बांधावरील गवताच्या काडीलाही धक्का लागू नये, याची काळजी घेत असत. मात्र आता महाराज यांचे नाव घेऊन कारभार करणारे राज्यकर्ते जनतेला लुटा; पण आमचा वाटा टाका असे म्हणत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
येथील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या मराठा साम्राज्याच्या आरमार प्रमुखांच्या कार्य आणि शौर्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'सरखेल कान्होजी आंग्रे दर्यासागर' या सजीव देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बीशिवाय गणेशोत्सव साजरा करते. मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनीही घेतला पाहिजे. मंडळात देखाव्याच्या माध्यमातून कल्पकता आणि कलेला वाव दिला जातो, हे कौतुकास्पद आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बी न लावता गणेशोत्सव साजरा करते. विविध सामाजिक कामातही आघाडीवर आहे. उद्योजक पाटील म्हणाले, लेटेस्ट तरुण मंडळ सामाजिक भान ठेवून सातत्याने सामाजिक कार्यात आघाडीवर असते.
मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी उद्योजक नितीन दलवाई, कविता पोवार, सरदार पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास उत्सव प्रमुख केदार सूर्यवंशी, अनिल ढवण, अजित पवार आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.