जालना लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी सांगली जिल्हा बंद!
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय
सांगली : खरा पंचनामा
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवार दि. 7 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी सांगलीत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
शुक्रवार दि. 1 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी येथे आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला. यात अनेक पुरुष, महिला, मुले जखमी झाली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. सांगलीतही याचा निषेध करण्यात आला. लाठीमाराच्या निषेधासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अनेकांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी गुरुवार दि. 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बंद झाल्यानंतर मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मोर्चाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
लाठीमाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व सवलती लागू करू असे सांगितले आहे. त्याबाबत जीआर त्यांनी तातडीने द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या बैठकीला जतचे आमदार विक्रम सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, उमेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, शंभोराज काटकर, नितीन चव्हाण, राहुल पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.